मुख्य बातमी

मायभारत रत्नागिरीतर्फे ४ नोव्हेंबरला ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ चे आयोजन

‘एक देश, एक निवडणूक’ विषयावर रंगणार वैचारिक मंथन; १८ ते २५ वयोगटातील तरुणांना सहभागाचे आवाहन

रत्नागिरी : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘विकसित भारत @२०४७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘माय भारत’ च्यावतीने ४ नोव्हेंबर रोजी ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम स्थानिक फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (FAMT) येथे सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे हे नवे रूप असून देशातील तरुणांना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या युवा संसदेसाठी ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) हा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय निश्चित करण्यात आला आहे.

या युवा संसदेमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना सहभागी होता येईल. वयाच्या गणनेसाठी १७ ऑगस्ट २०२६ ही तारीख ग्राह्य धरली जाईल. तसेच, यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या संसदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत गुगल फॉर्म (Google Form) भरून आपली नोंदणी पूर्ण करावी. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी या वैचारिक व्यासपीठाचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!