खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या खो-खोपटूंची कसोटी
६ नोव्हेंबरला बालेवाडीत मुला-मुलींची राज्यस्तरीय निवड चाचणी : तेलंगणातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघनिवडीची प्रक्रिया

पुणे : राष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या युवा खो-खोपटूंसाठी आता गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आगामी ८ व्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२६ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवण्यासाठी राज्यातील मुला-मुलींच्या खेळाडूंना मैदानावर आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांची निवड चाचणी ६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
आगामी ११ ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत तेलंगणा येथे ८ वी खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची निवड करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहकार्याने ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. या चाचणीत खेळाडूंच्या मैदानावरील कौशल्याची आणि कामगिरीची कसोटी घेतली जाणार असून, त्यातून महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघासाठी गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात येईल.
निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे : आधारकार्ड किंवा पासपोर्ट, इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र, जन्मतारखेच्या पाच वर्षांच्या आत वितरित केलेला मूळ जन्मदाखला, शाळेचे बोनाफाइड प्रमाणपत्र याशिवाय खेळाडूंनी सराव व निवड चाचणीसाठी आवश्यक असलेले स्पोर्ट्स शूज सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवड चाचणीच्या दिवशी खेळाडूंची भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे आणि क्रीडा साहित्य सोबत आणण्याची दक्षता घ्यावी.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पत्रकाद्वारे निवड चाचणीची माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी श्री. संतोष बाबळे (मो. ७५८८१६९४९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
खेलो इंडिया हे युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे बालेवाडीतील या निवड चाचणीकडे केवळ संघनिवड म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या युवा खो-खो प्रतिभेला राष्ट्रीय झेप घेण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.



