मुख्य बातमी

मेरा युवा भारततर्फे ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद’ जिल्हास्तरीय फेरी उत्साहात

तीन गुणवंत वक्त्यांची राज्यस्तरासाठी निवड

रत्नागिरी : भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’च्या वतीने आयोजित ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद’ अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व निवड फेरी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (FAMT) येथे अत्यंत उत्साहात झाली. जिल्ह्यातील तरुणांच्या वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेतून तीन गुणवंत वक्त्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी “एक देश, एक निवडणूक” हा चालू घडामोडींवर आधारित विषय ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या होतकरू वक्त्यांनी या विषयाच्या घटनात्मक, आर्थिक आणि सामाजिक पैलूंवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मते मांडून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सायबर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून तरुणांनी राष्ट्रउभारणीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आणि लोकशाही प्रक्रियेत वैचारिक योगदान देण्याचे आवाहन श्रीमती सुतार यांनी केले.

याप्रसंगी फिनोलेक्स अकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रकाश आणि प्रथम वर्ष रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नागरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कसोशीच्या फेरीत आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाच्या जोरावर खालील तीन स्पर्धकांनी बाजी मारत राज्यस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान श्रावणी पवार, सानिया यादव आणि अंकिता जाधवराव यांनी मिळवला.

या संपूर्ण स्पर्धेचे सुसूत्र व नेटके नियोजन जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या व्यासपीठावर रत्नागिरीतील तरुणांना आपले विचार मांडण्याची मोठी संधी या उपक्रमामुळे मिळाली असून, निवड झालेल्या विजेत्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!