मुख्य बातमी

आर्ट सर्कलची साहित्यिक आणि सांस्कृतिक दिवाळी

सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त भरगच्च उपक्रम 

रत्नागिरी : प्रख्यात लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये ‘सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी वर्ष उपक्रम’ साकारत आहे. त्याचे संपूर्ण आयोजन आर्ट सर्कल नेहमीप्रमाणेच भरगच्च करत आहे.

दि. ७ आणि ८ रोजी या दोन्ही दिवशी सकाळी १०.३० वाजता कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृह, पटवर्धन हायस्कूल येथे अभिनेत्री शुभांगी दामले, लेखिका नीता कुलकर्णी, दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या हस्ते अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन होईल. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होणारी ही स्पर्धा दिवसभर चालेल. बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर आणि आरती प्रभू यांच्या कविता काव्य अभिवाचन स्पर्धेत, तर सुनीताबाई लिखित पुस्तकांमधील आशय गद्य अभिवाचन स्पर्धेत स्पर्धक सादर करतील. ७ तारखेला स्पर्धा संपल्यानंतर शुभांगी दामले ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करणार आहेत. ८ तारखेला स्पर्धा संपल्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी उदय पंडित अभिवाचन सादर करणार आहेत. रत्नागिरीची कन्या सुनीताबाई या पटवर्धन हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी, त्यामुळे दोन्ही स्पर्धा त्यांच्या शाळेत अर्थात पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहेत. काव्यप्रेमी, साहित्यप्रेमी रसिकांनी अवश्य या स्पर्धांना आणि त्यानंतरच्या सादरीकरणाला अवश्य उपस्थित राहावे.

दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता नाट्यगृहात पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि त्यानंतर पु. लं.च्या साहित्यावर आधारित मुकेश माचकर मराठी वाङमयाचा घोळीव इतिहास असे दोन दीर्घांक सादर होणार आहेत. दोन्हींचे दिग्दर्शन मंगेश सातपुते यांनी केले आहे.

दि. ८ रोजी दिवसभराच्या अभिवाचन स्पर्धेच्या उपक्रमानंतर संध्याकाळी ७ वाजता ‘रूंग्ली रूंग्लीयॉट’ या कार्यक्रमातून अभिवाचनाचा वास्तूपाठ सादर होईल. जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांच्या पत्रांचे अफाट साहित्यिक मूल्य माधुरी पुरंदरे आणि गिरीश कुलकर्णी आपल्या अभिवाचनाद्वारे रसिकांपुढे उभे करतील. हा कार्यक्रम सावरकर नाट्यगृहात होईल. नावापासूनच वेगळेपणा जपणाऱ्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केले आहे.

दि. ९ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. दिवसभराच्या या कार्यक्रमांमध्ये साहित्य, कविता, साहित्य विश्वातील सुनीताबाईंचे योगदान, त्यांचे व्यक्तिमत्त्व असे विषयांचे वैविध्य राहणार आहे. कवि आणि लेखक किरण येले ‘सुनीताबाईंच्या आत्मचरित्राच्या वेगळेपणा’बद्दल बोलतील. लेखक प्रवीण बांदेकर ‘आहे मनोहर तरी- खूप काही आहे’ या विषयावर बोलतील. कवितेवर नितांत प्रेम करणारे आणि कवितेचा अफाट अभ्यास असणारे संगीतकार कौशल इनामदार ‘कवितेचे विभ्रम’ सादर करतील. सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी ‘केशरी प्रहर’ मधून स्वतःच्या कविता सादर करतील. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते किरण यज्ञोपवित ‘सुनीताबाई आणि नाटक’ या विषयावर बोलतील. सुनीताबाईंचा अतिशय निकटचा सहवास लाभलेल्या लेखिका मंगला गोडबोले ‘सुनीताबाईं’बद्दल बोलतील. लेखक मुकुंद संगोराम यांनी ललित लेखांसाठी सुनीताबाईंना आग्रह करून लिहायला लावले, ते पुस्तक रूपात प्रकाशित होण्यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यांचाही सहभाग या दिवशी असणार आहे. अभिनेत्री भारती आचरेकर यांना संगीत आणि अभिनय यातील त्यांच्या सहभागामुळे पु. लं.चा भरपूर सहवास लाभला. त्यांच्याबद्दलचे किस्से आणि त्याच्या जोडीला गाणी असे मिश्र सादरीकरण भारती आचरेकर करणार आहेत. पु. लं. चे पुतणे जयंत देशपांडे आणि सुनीताबाईंच्या माहेरचे संतोष ठाकूर आणि अन्य भाचवंड या कार्यक्रमात विशेष सहभाग घेऊन अत्यंत जवळून पाहिलेले ‘भाई काका आणि सुनीता आत्या’ यांच्याबद्दल बोलतील, किस्से सांगतील. ९ तारखेच्या कार्यक्रमांची ही रेलचेल सोडून जायला लागून प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये म्हणून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांची दुपारच्या भोजनाची सोय सावरकर नाट्यगृहातच करण्यात आली आहे.

तीनही दिवस या सर्व उपक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे. “आहे मनोहर तरी” या गाजलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे चित्रकार बाळ ठाकूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत जवळपास तीनशे पुस्तकांच्या मुखपृष्ठांची चित्रे आपल्या कुंचल्यातून साकारली. नाट्यगृहात त्या सर्व पुस्तकांचे व रेखाचित्रांचे प्रदर्शन तीनही दिवस पाहण्यासाठी खुले राहील. सावरकर नाट्यगृहात हे तीनही दिवस साहित्यप्रेमींसाठी छोटेखानी पुस्तक प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. निवडक आणि दर्जेदार पुस्तके उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

ही साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला रसिकांनी जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन आर्ट सर्कलने केले आहे.

या सर्व उपक्रमाला राज्य मराठी विकास संस्थेने आर्थिक सहकार्य केले आहे. तसेच, उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!