मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात ७४.५५ टक्के मतदान

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह १० प्रभागातील ५४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

राजापूर : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (२ डिसेंबर) झालेल्या मतदान प्रक्रियेत दिवसभरात ७४.५५ टक्के मतदान झाले असून, शहरातील ३०९२ महिला, तर २९७९ असे मिळून ६०७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सुरुवातीपासूनच राजापूरकरांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सकाळच्या टप्प्यात पहिल्या दोन तासांत म्हणजेच ९.३० वाजेपर्यंत सरासरी १४.२५ टक्के मतदान झाले होते . त्यानंतर पुढील दोन तासांत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आणि ११.३० पर्यंत सरासरी ३०.२८ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६४.३४ टक्के इतकी झाली.

राजापूर नगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे महिलांच्या हाती असली, तरी सकाळच्या सत्रात पुरुष मतदारांचा टक्का जास्त होता. सकाळी साडेअकरापर्यंत शहरातील १३५१ पुरुष मतदारांनी, तर १११५ स्त्री मतदारांनी मतदान केले होते. मात्र त्यानंतर दुपारच्या सत्रात महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावताना दुपारी ३.३० पर्यंत २६६६ महिला मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली. दुपारच्या सत्रात सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक ३ मध्ये झाले व येथील टक्केवारी सर्वाधिक ७३. ९९ इतकी होती. संध्याकाळच्या सत्रातही मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी साडेपाच पर्यंत ७४.५५ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!