चिपळूणमधील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद

चिपळूण : तालुक्यातील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करून, वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग खडपोली-पेढांबे-अलोरे-शिरगांव- कुंभार्ली कोड – फणसवणे रस्ता (प्रजिमा २८ पर्यंत) अशी वळविण्यात यावी. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चिपळूण तालुक्यातील विकास कामांना दिलेल्या भेटी दरम्यान, अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल (ग्रामा २५८) रस्त्यावरील किमी ०/०५० मधील पुलाची पाहणी केली असता, हा पूल नादुरुस्त असल्याचे आढळले. हॉल पूल ८० मीटर लांबीचा व २.५० मीटर रुंदीचा असून पुलावरून खासगी वाहतूक सुरू आहे. या पुलाचे ८ पिलर पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले असून, हा पिलर व पुलाच्या खालच्या बाजूचे कॉंक्रीट पडल्याने स्टील उघडे पडले आहे. तसेच २ पिलरच्या पायाच्या तळापर्यंत मोठी भगदाडे पडली असून, हा पूल कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या पुलाचे बांधकाम सन २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता यांनी केलेली पाहणी व उप अभियंता, जि. प. बांधकाम उप विभाग चिपळूण यांनी दिलेल्या अहवालानुसार, पूल वापरण्यास अतिशय धोकादायक झाल्याचे दिसत असून, वाहतुकीस बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीस बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच या पुलाऐवजी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- खडपोली पेढांबे अलोरे शिरगांव कुंभार्ली कोड फणसवणे रस्ता असा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, जिल्हादंडाधिकारी यांच्या मान्यतेने, अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या पुलावरील वाहतूक बंदचे आदेश दिले आहेत.



