मुख्य बातमी

चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

रत्नागिरी : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस (इयत्ता सातवी) प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर ३० डिसेंबर २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही परीक्षा २६ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती संकेतस्थळावरील अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिसूचनेतील प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.

सुधारीत शासन निर्णयानुसार पूर्वी इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता अनुक्रमे चौथी व सातवीसाठी घेतली जाणार आहे. सन २०२५-२६ हे संक्रमण वर्ष असेल, ज्यात जुन्या (पाचवी व आठवी) आणि नवीन (इ. चौथी व सातवी) दोन्ही इयत्तांच्या परीक्षा होतील. इयत्ता चौथीसाठी शिष्यवृत्तीची दरमहा ५०० रुपये, तर सातवीसाठी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा ७५० रुपये तीन वर्षांसाठी असेल. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगु, कन्नड या माध्यमांमध्ये देण्यात येऊ शकते. बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये, तर मागासवर्गीय/दिव्यांगांसाठी १२५ रुपये परीक्षा शुल्क असेल. प्रत्येक शाळेला २०० रुपये शाळा नोंदणी शुल्क भरावे लागेल.

परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासनमान्य (सरकारी/अनुदानित/खासगी) शाळेत चौथी किंवा सातवीमध्ये शिकत असावा. चौथीसाठी कमाल १० वर्षे (दिव्यांगांसाठी १५ वर्षे), सातवीसाठी १३ वर्षे (दिव्यांगांसाठी १७ वर्षे) वयोमर्यादा असेल. प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. सीबीएसई किंवा आयसीएसई अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येतील पण त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही.

ही अधिसूचना www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!