भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत पटवर्धन हायस्कूलचे दैदीप्यमान यश

रत्नागिरी : भूगोल अभ्यास आणि परीक्षा केंद्र, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा २०२५’ मध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तुंग कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये अर्णव अभिजीत जोशी (इयत्ता ५ वी) याने ८८ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले. अभिनव जीवन देसाई (सातवी) याने ८६ गुण मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. मृण्मयी श्रीगुरुदास दांडेकर (पाचवी) हिने ८२ गुण मिळवून कांस्य पदक विशेष प्राविण्य प्राप्त केले. याबरोबरच शौनक गोखले (८० गुण), आकाश कुलकर्णी (७८ गुण), सानिका अल्लोळकर (७८ गुण) आणि आद्या हर्षे (७६ गुण) यांनीही परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या यशामागे भूगोल विषयाच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र समन्वयक श्री. गोरे यांच्यासह भूगोल विषय शिक्षक श्री. पालकर, श्रीमती डोंगरे, श्रीमती सुर्वे, श्रीमती काटकर, श्री. पाडाळकर, श्री. मोहिते आणि श्रीमती अहिरे यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी करून घेतली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर, पर्यवेक्षक शिरोळकर मॅडम आणि पर्यवेक्षक श्री. लवंदे या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी शहरातून व पालकांमधून या यशस्वी विद्यार्थ्यांवर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



