मुख्य बातमी

सुरक्षित इंटरनेट दिन १० फेब्रुवारी रोजी

स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवडी, एआयचा सुरक्षित व जबाबदार वापर संकल्पना

रत्नागिरी : सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभर साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याबाबत, विशेषतः मुले व तरुण यांच्यामध्ये जनजागृती करणे हा आहे. दरवर्षी या दिवशी नव्या ऑनलाइन समस्या आणि सध्याच्या आव्हानांबाबतही लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिन १० फेब्रुवारी रोजी “स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवडी, एआयचा सुरक्षित व जबाबदार वापर” या संकल्पनेखाली साजरा केला जाणार आहे.

या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आपल्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रकल्पाअंतर्गत १० फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यासाठी देशभर विविध जनजागृती उपक्रम राबविणार आहे.

मंत्रालय १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ आयोजित करत आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षित इंटरनेट दिनाची ही संकल्पना राज्ये, जिल्हे, तालुका मुख्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पूर्वतयारी उपक्रम म्हणून राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांची प्रमुख उद्दिष्टे अशी : इंटरनेट आणि एआयच्या सुरक्षित व जबाबदार वापराविषयी वापरकर्त्यांना संवेदनशील बनवणे. सायबर स्वच्छतेच्या (Cyber Hygiene) उत्तम पद्धतींचा प्रचार करणे. प्रमुख सायबर धोके आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती देणे.

इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रकल्पाअंतर्गत १० फेब्रुवारी रोजी देशभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याचा प्रस्ताव आहे.

या मोहिमेद्वारे विविध स्तरांवरील इंटरनेट वापरकर्त्यांना सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर स्वच्छता, सायबर धोके व त्यावरील उपाय, तसेच जबाबदार ऑनलाइन वर्तन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी साजरा करण्याचाही प्रस्ताव आहे.

प्रस्तावित जनजागृती उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यशाळा, इंटरनेट सेवा पुरवठादारांमार्फत जनजागृती मोहीम, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन जनजागृती कार्यशाळा, ऑनलाइन सुरक्षा जनजागृती मोहीम, भारतासाठी ऑनलाइन सुरक्षिततेबाबत सार्वजनिक जनजागृती मोहीम कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत होणार आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सर्व नागरिकांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि समावेशक डिजिटल पर्यावरण निर्माण करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!