मुख्य बातमी

टीडब्ल्यूजेतील आरोपीला जेवण देणाऱ्या पोलिसांना कारणे दाखवा : पोलीस अधीक्षक 

रत्नागिरी : टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घाग याला हॉटेलमध्ये जेवण देणाऱ्या चिपळुणातील पोलिसांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संकेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या संकेश याला चिपळूण पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयापुढे हजर करताना पोलिसांनी संकेश याला एका हॉटेलमध्ये जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलिसांचे काय म्हणणे आहे, हे आपण मागविले असल्याचे बगाटे यांनी सांगितले.

संकेश हा टीडब्ल्यूजे कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होता. पुणे येथून संकेश याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली होती. यानंतर गुंतवणुकदारांनी मोठी गर्दी चिपळूण येथील सत्र न्यायालय परिसरात केली होती. २७ जानेवारी रोजी पोलिसांकडून त्याला न्यायालयापुढे आणण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने संकेश याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या जेवणामुळे नागरिकांमध्ये संतोष निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आपण कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचे पोलीस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!