उपोषणाचा इशारा देताच घंटागाडी सेवेत रुजू
वाटद मिरवणे ग्रामपंचायतीने नीलेश रहाटे यांच्या पत्राची घेतली दखल

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये घेतलेली घंटागाडी गेले वर्षभर केवळ शोभेची बाहुली बनून राहिली होती. ग्रामस्थांच्या सेवेसाठी १५ व्या वित्त योजनेमधून खर्च करून घेतलेल्या गाडीचा काहीच उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्यप्रचार प्रमुख व पत्रकार नीलेश रहाटे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र त्यानंतर आता ही १७ मार्चपासून लोकसेवेत रुजू करण्यात येणार असल्याचे पत्र नुकतेच संबंधित ग्रामपंचायतीने श्री. रहाटे यांना दिले आहे.

ग्रामस्थांच्या घरातील कचरा उचलणे काय सोयीचे व्हावे या हेतूने वाटद मिरवणे ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त योजनेमधून घंटागाडी खरेदी केली होती. मात्र वर्षभरापूर्वी घेतलेल्या गाडीचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्यप्रचार प्रमुख आणि पत्रकार नीलेश रहाटे यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी लाक्षणिक उपोषणाचे पत्र दिले होते.
या पत्राची वाटद मिरवणे ग्रामपंचायतीने दखल घेतली असून, १७ मार्चपासून घंटागाडी सेवेत रुजू करत आहोत, अशा आशयाचे पत्र श्री. रहाटे यांना देण्यात आले आहे. वाटद मिरवणे ग्रामपंचायतीने या पत्राची दखल घेतल्याबद्दल श्री. रहाटे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

