अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खेड : खेड-दापोली मार्गावरील फुरुस भोलेश्वर वाडी फाट्यानजीक दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना आज (१९ मार्च) रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली.
फुरुस येथील सचिन गणू खामकर (वय ४१) हे आपल्या ताब्यातील दुचाकी गाडी घेऊन साखरोली येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरून ते पुन्हा घरी जात असताना खेड – दापोली रस्त्यावरील फुरुस भोलेश्वर वाडी फाट्यानजीक त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ते जागीच मृत्युमुखी पडले. हा अपघात झाल्यानंतर खेड – दापोली मार्गावरील वाहतूक तब्बल तासभर खोळंबली होती. रात्री उशिरापर्यंत त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम खेड पोलिसांमार्फत सुरू होते.
स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी नंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी खेड पोलिसांना मदत केली. रात्रीची वेळ असल्यामुळे नेमका अपघात कसा झाला, तसेच हा मार्ग तसा निर्मनुष्य असल्यामुळे या अपघात संदर्भात फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.



