ल .ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात महामानव डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

रत्नागिरी : शहरातील ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाविषयी समूहगीत सादर केले. बाबासाहेबांचे जीवन उलगडून सांगणारे नृत्यही सादर झाले. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांविषयी मराठीतून तसेच इंग्रजीतून भाषणे केली. बालवाडीत शिकणारा प्रसेनजीत अक्षय मिसाळ याने ओघवत्या शैलीत आपले भाषण सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. औघडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून ते संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली पाहिजे. मेहनत, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास यांनी कोणतीही गोष्ट अशक्य नसते असे मत मांडले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राची आठवण करून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सूर्यवंशी यांनी केले.



