पोलीस दलात निवड झाल्याबद्दल हेमांगी देसाईचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील शीळ गावची सुपुत्री हेमांगी गजानन देसाई हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी हेमांगीच्या निवासस्थानी जाऊन तिचा विशेष सत्कार केला आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एका सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीतून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हेमांगीने पोलीस भरतीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शीळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील मुलींसमोर तिने एक आदर्श ठेवला आहे. या प्रसंगी प्रामुख्याने उप तालुकाप्रमुख विजय देसाई, उपविभाग प्रमुख अशोक विचारे, काळबादेवी शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मयुरेश्वर पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील मुली जेव्हा अशा प्रकारे सरकारी सेवेत आणि त्यातही पोलीस दलात संधी मिळवतात, तेव्हा समाजाचा आत्मविश्वास वाढतो. हेमांगीचे यश हे तिच्या कष्टाचे फळ आहे.” या सत्कारामुळे देसाई कुटुंबीयांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.



