लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात कायदेशीर सहकार्याचे आश्वासन
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा पाठिंबा

लोटे : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनासंदर्भातील कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
पी-फास (PFAS) या घातक आणि सहज नष्ट न होणाऱ्या रसायनाच्या उत्पादनाला विरोध करत स्थानिक नागरिकांनी या कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे प्रशासन आणि राज्य सरकारने अद्याप ठोस दखल घेतलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम आहेत.
दि. १२ रोजी पुणे येथे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या निवासस्थानी कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी अशोक जाधव, उदय घाग, रवींद्र गोवळकर, जितेंद्र आंब्रे आणि सुबोध सावंतदेसाई आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्यात निर्माण होणाऱ्या पी-फास रसायनाच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देत निवेदन सादर केले. पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी हे रसायन धोकादायक असल्याची भूमिका समितीने मांडली.
यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोकणातील जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



