नव्या नाट्यलेखकांना संधी; नाट्य परिषदेची ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’

मुंबई : मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ राबविण्यात येत आहे. नवोदित तसेच अनुभवी नाट्यलेखकांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
काळानुरूप समाज, माणसांचे प्रश्न, नाती, संघर्ष आणि जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. या बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब नव्या नाटकांमधून रंगभूमीवर उमटणे आवश्यक आहे. अनेक नवोदित लेखकांच्या मनात नाटकाची संकल्पना, कथा आणि व्यक्तिरेखा असतात; मात्र या कल्पनांना रंगमंचापर्यंत नेण्यासाठी योग्य व्यासपीठ व प्रोत्साहनाची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन नाट्य परिषदेकडून ही योजना सातत्याने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन देणे, नवीन नाटककारांना संधी उपलब्ध करून देणे आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार तसेच काळाशी संवाद साधणारे नवे साहित्य मिळवून देणे हा आहे. या योजनेतून पारितोषिक मिळालेल्या नाट्यसंहिता प्रकाशित करण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे.
योजनेसाठी पाठविण्यात येणारी नाट्यसंहिता मराठी भाषेतील आणि दोन अंकी असणे आवश्यक आहे. संहिता पूर्णपणे नवीन असावी. ती यापूर्वी अन्य कोणत्याही नावाने नोंदणीकृत अथवा प्रकाशित झालेली नसावी तसेच तिचे यापूर्वी कोणतेही नाट्यप्रयोग झालेले नसावेत.
इच्छुक लेखकांनी आपल्या नाट्यसंहितेच्या दोन टंकलिखित अथवा सुवाच्य हस्तलिखित प्रती २० ऑक्टोबरपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टैंक रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१६ येथील मध्यवर्ती कार्यालयात पाठवाव्यात. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
योजनेअंतर्गत रु. २१ हजार, रु. १५ हजार, रु. ११ हजार आणि रु. ३ हजार अशी प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून संगीत नाटकासाठी विशेष रु. ११ हजार पारितोषिक देण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीला नव्या लेखकांची, नव्या विषयांची आणि नव्या विचारांची गरज असून, लेखकांनी लिहिलेले एखादे नाटक उद्याच्या रंगभूमीचा महत्त्वाचा अध्याय ठरू शकते. त्यामुळे नाट्यलेखनाची आवड असलेल्या लेखकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.



