रत्नागिरीतील कॉन्क्रीट रस्त्यांचं वास्तव काय? अरुंद रस्ते बनले मृत्यूचा सापळा
रत्नागिरी नगरपालिका गप्प का? - ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा गंभीर सवाल

रत्नागिरी : शहरातील १०० किमी रस्ते कॉन्क्रीट करण्याचा गाजावाजा करणाऱ्या नगरपालिकेचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या कॉन्क्रीट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जा आणि नियोजनशून्य कामामुळे सामान्य रत्नागिरीकरांचा जीव धोक्यात आला असून, यावर ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नगरपालिकेला थेट जाब विचारला आहे.
फुटपाथ मोकळे करण्यासाठी गरीब विक्रेत्यांवर कारवाई करणारी नगर पालिका, कॉन्क्रीट रस्त्यांच्या घोळावर मात्र मूग गिळून गप्प का आहे? असा घणाघात सावंत यांनी केला.
*पालिकेच्या कारभारावर प्रसाद सावंत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. १०० किमी रस्ते पूर्ण झाले का? टेंडर निघाल्यापासून किती महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते? मुदत संपूनही काम अपूर्ण असेल तर ठेकेदाराला नोटीस बजावली का? पूर्वीच्या डांबरी रस्त्यांपेक्षा कॉन्क्रीट रस्ते अरुंद झाले आहेत. दोन एसटी बसेस एकमेकांना पास होऊ शकत नाहीत. यात सामान्य नागरिक भरडला जातोय, याचे दुःख पालिकेला दिसत नाही का? कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक टाकायचे होते, त्याला किती महिने झाले? साईडपट्टी अर्धवट असल्याने किती अपघात झाले? याला जबाबदार कोण? नगरपालिका की ठेकेदार? बऱ्याच ठिकाणी साईडपट्टी डांबरीने भरली आहे. मग तिथे पेवर ब्लॉक बसणार की नाही? बसणार असेल तर हा डांबरीचा अतिरिक्त खर्च कोणी केला? जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी का?
मारुती मंदिर सर्कलला कोबल स्टोन (दगडी) रस्ता का बनवला? याची सध्याची अवस्था नगरपालिकेने पाहिली का? कोबल स्टोनचा हा घाट कोणासाठी घातला? जर टेंडरमध्ये कॉन्क्रीट असेल आणि काम कोबल स्टोनचे झाले असेल, तर ठेकेदाराला डबल फायदा कोणी करून दिला? कॉन्क्रीटीकरणावर न्यायालयात लढाई सुरू असताना कोबल स्टोनचे काम करता येते का? याचे उत्तर नगरपालिका देईल का? दोन कॉन्क्रीट स्लॅबमधील जोडाची (जॉइंट) एकदा पाहणी करा, म्हणजे समजेल रत्नागिरीकर किती खड्ड्यातून प्रवास करत आहेत.
“नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करायला तुम्ही गरीब विक्रेत्यांना हटवले, चांगली गोष्ट आहे. मग हीच तत्परता दाखवून या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठेकेदाराची चौकशी कधी लावणार? रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कामाची जबाबदारी निश्चित करा, अन्यथा युवासेना रस्त्यावर उतरेल,” असा इशारा प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
या प्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


