शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि प्रवासी संघटनांच्या लढ्याला मोठे यश
एसटीचा अतिरिक्त २ रुपये 'स्वच्छता कर' १ जून २०२६ पासून अखेर रद्द

रत्नागिरी : एसटी बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेच्या नावाखाली महामंडळाने प्रत्येक प्रवाशाकडून अतिरिक्त २ रुपये आकारण्याचा घेतलेला वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि इतर जिल्ह्यातील विविध प्रवासी संघटना यांनी उभारलेल्या आक्रमक लढ्यानंतर परिवहन मंत्र्यांनी हा स्वच्छता कर १ जून २०२६ पासून अधिकृतपणे रद्द केल्याची घोषणा केली. यामुळे रत्नागिरीसह राज्यातील कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटावर २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (स्वच्छता कर) लागू केला होता. या निर्णयाविरोधात सर्वसामान्य जनता आणि प्रवासी संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी आधीच रखडलेल्या रस्त्यांचे संकट, बसेसची कमतरता आणि विविध समस्यांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांवर हा अतिरिक्त ‘आर्थिक भुर्दंड’ लादणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी भूमिका दत्ता कदम यांनी घेतली होती.
स्वच्छता राखणे ही महामंडळाची नैतिक आणि मूलभूत जबाबदारी आहे, त्यासाठी प्रवाशांकडून पैसे उकळणे बेकायदेशीर आहे, असे सांगत दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत व इतर जिल्ह्यातील प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी विभाग नियंत्रक तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांच्या संचालक मंडळाला कडक शब्दांत निवेदन दिले होते. हा कर त्वरित रद्द न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा पक्ष आणि प्रवासी संघटनांनी दिला होता.
या निवेदनाची, प्रवासी संघटनांच्या वाढत्या दबावाची आणि जनक्षोभाची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला. प्रवाशांकडून आकारला जाणारा अतिरिक्त २ रुपयांचा स्वच्छता कर येत्या १ जूनपासून पूर्णपणे रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी अधिकृतपणे घोषित केले.
हा कर रद्द झाल्याचे समजताच रत्नागिरीतील एसटी प्रवाशांनी, प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी धावून जाणाऱ्या आणि महामंडळाला नमवणाऱ्या जिल्हाप्रमुख दत्ता कदम व प्रवासी संघटनांचे प्रवाशांनी मनापासून आभार मानले आहेत.



