मुख्य बातमी

कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी

स्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश

रत्नागिरी : राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज कसबा-संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्रस्तावित स्मारकाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जाणून घेतले. या दौऱ्यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहणी दरम्यान श्री. खारगे यांनी स्पष्ट केले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाला साजेसे, भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन अत्यंत सकारात्मक आहे. केवळ स्मारकच नव्हे, तर या परिसरातील पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक ‘सरदेसाई वाडा’ परिसराचे संवर्धन व विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या शासन स्तरावरून युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लावून शिवभक्तांसाठी एक दर्जेदार प्रेरणास्थान निर्माण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण भेटीमुळे कसबा-संगमेश्वर येथील स्मारकाच्या कामाला आता अधिक गती मिळण्याची चिन्हे दिसत असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!