मुख्य बातमी

मुरुगवाडा येथील लहान मुलांच्या दफनभूमीला संरक्षक भिंत बांधणार

नगरसेवक अमित विलणकर यांच्या मागणीला नगराध्यक्षांची अनुकूलता

रत्नागिरी : मुरुगवाडा येथील ऐतिहासिक ‘भागोजीशेठ कीर स्मशानभूमी’ परिसरातील लहान मुलांच्या दफनभूमीला वन्य व पाळीव प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मृतदेहांची अवहेलना रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक अमित विलणकर यांनी केली आहे. या मागणीची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी या कामाला सकारात्मक अनुकूलता दर्शवली आहे.

मुरुगवाडा भागातील या दफनभूमीत संरक्षक भिंत नसल्यामुळे वन्य व मोकाट पाळीव प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे लहान मुलांच्या मृतदेहांची अवहेलना होण्याची भीती निर्माण झाली असून, या संवेदनशील जागेला तातडीने सुरक्षित करणे गरजेचे बनले होते. नागरिकांची हीच अडचण ओळखून नगरसेवक अमित विलणकर यांनी नगराध्यक्षांकडे तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली.

नगरसेवकांच्या या रास्त मागणीचा आदर करत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आश्वासन दिले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शासकीय निधीतून या संरक्षक भिंतीच्या कामाची पूर्तता केली जाईल.

या कामामुळे मुरुगवाडा परिसरातील दफनभूमीला पूर्ण सुरक्षा मिळणार असून, मृतदेहांची होणारी संभाव्य अवहेलना कायमची थांबेल. नगरसेवक अमित विलणकर यांच्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!