देवदत्त परुळेकर यांचे आम्ही साहित्यप्रेमीतर्फे ओरोसला शनिवारी निरुपण

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मे महिन्याच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (२३ मे) सायंकाळी ५.३० वाजता प्रवचनकार, निरुपणकार, मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ह.भ.प. (ॲड.) देवदत्त परुळेकर यांचे ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ (संतपरंपरेचे सामाजिक योगदान) या विषयावर निरुपण होणार आहे.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग पंधरावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. नुकताच अधिकमास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरु झाला आहे. यानिमित्त ह.भ.प. देवदत्त परुळेकर यांच्या निरुपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या पंक्तीमध्ये महाराष्ट्र धर्माचे सार दडले आहे. अठरापगड जातींमधून आलेल्या संतांनी मराठी माणसाला समानतेची, विश्वबंधुत्वाची, माणुसकीची, विवेकाची आणि कर्मवादाची शिकवण दिली. जातीव्यवस्था, कर्मकांड आणि अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले.
ह.भ.प. देवदत्त परुळेकर आपल्या निरुपणात ही संतपरंपरा, तिचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्त्व आणि अर्थ, संतपरंपरेचे सामाजिक योगदान यावर प्रकाश टाकणार आहेत. आजच्या भोगवादी, स्वार्थ, भोंदुगिरीने बरबटलेल्या जगात विवेकाने कसे वागावे, संतांनी घालून दिलेला मार्ग कसा आचरावा, याचे मार्गदर्शन त्यांच्या निरुपणातून होईल. अत्यंत महत्वाचा असा हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.
ठीक ५.३० वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाला कुटुंबिय, परिवार, मित्रमंडळी यांच्यासह उपस्थित राहावे. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन व्यासपीठाचे समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.



