मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचातर्फे “देवानं प्रिय असोक” नाट्य कलाकृतीचा सन्मान

आबलोली : बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मिती आणि सिद्ध आर्ट प्रणित “देवानं प्रिय असोक” हा चक्रवर्ती सम्राट अशोकाचा युद्धापासून बुद्धाकडे घेऊन जाणारा अविस्मरणीय दोन अंकी नाट्य प्रयोग चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास इथल्या अपरान्त भूमीत नाट्यकला कृतीतून सादर केलेल्या सर्व कलावंतांचा सन्मान खरशेत च्या मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मंचचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी- भारत ( रजि) या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मनोज जाधव आणि समता सैनिक दल, चिपळूणचे भीम मार्शल प्रा. डॉ. गुलाबराव राजे, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, चिपळूण युनियनचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, सत्यशोधक संघटनेचे शिवश्री कृष्णाजी कोकमकर, संघराज कदम, संघमित्रा कदम, सौ. राजमुद्रा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मित सिद्ध आर्ट प्रणित “देवानं प्रिय असोक” यांचा सकल भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बुदीपाचा गौरवशाली इतिहास या महा नाट्यकला कृतीच्या रूपाने चिपळूण नगरीत सादर करण्यात आला. ही महा नाट्य कलाकृती म्हणजे प्रत्येक भारतीयांनी आवर्जून पहावे अशी सम्राट अशोकाची गौरवगाथा, त्यांच्या संमग्र जीवनातील धगधगता इतिहास अक्षरशः अपरान्तच्या नाट्य रसिकांना मनस्वी भावला. नाट्यातील विविध प्रसंग पाहताना मन गहिवरून येते. मनात विचारांचे काहूर निर्माण होते. क्षणाक्षणाला हृदयाची धडधड आणि कळत नकळत डोळ्यातून ओंघळणारे अश्रू यातील प्रत्येक प्रसंगांना दाद देत होते.
यातील कलिंग युद्धानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या सम्यक विचारांशी समरस होऊन आपल्या दोन्ही मुलांना धम्माच्या प्रचाराकरिता परदेशात पाठवून धम्मक्रांती घडवून आणतो .शिलालेख ,स्थापत्य कला, विद्यापीठांची नवनिर्मिती करून अखंड जम्बुदीपामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणतो. कुशाग्र बुद्धीचा, कर्तव्यदक्ष महापराक्रमी सम्राटाच्या जीवनावर बेतलेला या नाट्यप्रयोगाने चार चांद लावले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावचे सुपुत्र प्रतिभावंत लेखक उदय गणपत जाधव यांच्या सिद्ध हस्ते लेखणीतून साकारलेली ही नाट्य कृती आणि राजापूरची सुकन्या सहनिर्माती पुनम मांजलकर यांच्या कल्पक संकल्पनेतून निर्माण झालेले ‘देवान प्रिय असोक’ ही महा नाट्यकला कृती म्हणजे इतिहासातील एक अनमोल ठेवा म्हणावा लागेल. या महा नाट्यकला कृतीतील सर्वच कलावंतांनी आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली. त्याचबरोबर संगीत, पार्श्वगायन, नृत्य दिग्दर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा आणि दिमाखदार नेपथ्य या अविष्काराने अपरान्तवासियांना मंत्रमुग्ध केले. विशेषत: सम्राट अशोकाची भूमिका साकारणारे राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावचे सुपुत्र प्रितेश मांजलकर यांनी उपस्थित नाट्य रसिकांचा मनात घर केले.
या नाट्यप्रयोगाच्या समाप्तीनंतर मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे मुख्य प्रवर्तक श्री. कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचचे राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. जाधव, समता सैनिक दल, चिपळूणचे भीम मार्शल प्रा. डॉ. राजे, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश जाधव , सत्यशोधक संघटनेचे श्री. कोकमकर, संघराज कदम, संघमित्रा कदम, सौ. कदम यांच्या उपस्थितीत नाटकातील सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. शाल, पुष्प करंडक स्वरूपात सहनिर्मिती पुनम मांजलकर आणि सम्राट अशोकाची दमदार भूमिका निभवणारे जेष्ठ कलाकार प्रितेश मांजलकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
“सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा ते चिपळूण येथील महेंद्रगिरी (परशुराम क्षेत्र) या अपरान्त भूमीत ‘देवाना पिय असोक’ हे महानाट्य कलाकृतीच्या माध्यमाद्वारे सादर करताना आम्ही कृतार्थ झालो. उद्याच्या पिढीला सम्राट अशोक कळवा यासाठी प्रचार आणि प्रसार म्हणजे “देवान पिय असोक” ही एकमेव नाट्यकला कृती निश्चितच प्रेरणादायी ठरेल यामध्ये संदेह नाही,” असे प्रतिपादन मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे मुख्य प्रवर्तक श्री. कदम यांनी केले. या अपरान्त भूमीत या महानाट्याचे प्रयोग पुन्हा व्हावेत अशी समस्त चिपळूणकरांनी विनंती करून या बोधीवृक्ष फाउंडेशन आणि सिद्ध आर्ट प्रणित या नाट्यसंस्थेला आणि सर्व कलावंतांना मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचाच्या परिवाराच्यावतीने आणि उपस्थित चिपळूणच्या सर्व हौशी रसिक प्रेक्षकांच्या तसेच बौद्ध धम्म बंधू भगिनींच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या.
याप्रसंगी पुनश्च चिपळूणकरांच्या आग्रहास्तव या महानाट्याचा प्रयोग एप्रिल महिन्यामध्ये चिपळूण येथे आयोजित करण्याचा मानस बोधीवृक्ष फाउंडेशनच्या वतीने प्रितेश मांजलकर याने व्यक्त केला.



