मुख्य बातमी

रत्नागिरीत २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटींची गुंतवणूक

'जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६' मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २ हजार १५९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला बळ देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार असून, १०० कोटींची कोटींची गुंतवणूकk करणार आहे. जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ प्रवासी विमान उड्डाण घेईल.

कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.”

जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा यावेळी करण्यात आली. येत्या ७, ८ आणि ९ तारखेला जिल्ह्यात स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, यामुळे किमान १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘व्हीआयटी’कडून जमीन काढून ती ‘आरआरपी’ या सेमीकंडक्टर कंपनीला दिली जात आहे. निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषण विरहित एमआयडीसी उभारल्या जात आहेत.

उद्योगांसाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ (Milap) ॲप सुरू करण्यात आले असून सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या थेट ऑफर लेटर मिळेल. तसेच ‘मैत्री’ (Maitri) पोर्टलवर अर्ज केल्यास ३० दिवसांत दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाते. तरुणांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’ आणि केंद्राच्या ‘विश्वकर्मा योजने’चा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मिनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सावंत, राज आंब्रे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर यांनी आभार मानले.

जिल्हा गुंतवणूक करार 

आजपर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांत १८३७ गुंतवणूक करारांद्वारे ८२६५५ कोटींची गुंतवणूक झाली असून, १,५५,३८९ जणांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. आगामी कालावधीमध्ये उर्वरीत जिल्ह्यातील जिल्हा गुंतवणुक करार परिषदांचे आयोजन प्रस्तावित असून, त्याद्वारेही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन युवक व युवतींना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा 

रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ६२ उद्योग घटकांशी २१५९.३७ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणूकीतून एकूण २४२६ एवढी रोजगारनिर्मिती होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!