मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरला ब्लॅकमेल

२.२५ लाखांची खंडणीची मागणी : एकाविरोधात गुन्हा

राजापूर : सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका ३१ वर्षीय डॉक्टरला ब्लॅकमेल करून २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भीतीपोटी संबंधित डॉक्टरने २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर अखेर राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, लांजा तालुक्यातील साटवली येथील एका तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडदहसोळ म्हादयेवाडी येथील रहिवासी अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सन २०२५ मध्ये त्यांचा सोशल मीडिया अकाऊंटवरून एका महिलेशी संपर्क झाला होता. त्यानंतर संबंधित महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी डॉक्टरने स्वतःचे काही नग्न फोटो तिच्यासोबत शेअर केले होते.

दरम्यान, २२ मे रोजी सकाळी १० ते १०.०५ वाजण्याच्या सुमारास या जुन्या फोटोंचा गैरवापर करून आरोपीने डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साटवली, ता. लांजा) याने आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरून फिर्यादी डॉक्टरच्या व्हॉट्सॲपवर ते फोटो पाठवले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच हे फोटो सोशल मीडियावरून हटवण्यासाठी आणि इतरांना न दाखवण्यासाठी आरोपीने डॉक्टरकडे एकूण २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. या धमकीमुळे घाबरलेल्या फिर्यादी डॉक्टरने तातडीने गुगल पेद्वारे २५ हजार रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर केले.

मात्र, मानसिक त्रास वाढत असल्याने आणि पैशांची मागणी सुरूच राहिल्याने अखेर फिर्यादी डॉक्टरने २७ मे रोजी रात्री ११:२१ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!