क्रीडामहाराष्ट्रमुख्य बातमी

लातूरची जालन्यावर थरारक मात; रत्नागिरीचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

सोलापूर : स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत बुधवारी रंगलेल्या साखळी फेरीतील सामन्यांनी स्पर्धेची उत्कंठा अधिकच वाढवली. मुलींच्या गटात नंदुरबार आणि धुळे यांनी चुरशीच्या लढतीत निसटते विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर कुमार गटात मध्यंतराला पिछाडीवर असलेल्या लातूरने जालनावर शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. रत्नागिरीच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या गटातील अत्यंत रंगतदार सामन्यात नंदुरबारने जळगाववर ३६-३१ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. मध्यंतराला १९-१७ अशी मिळालेली आघाडी अखेर निर्णायक ठरली. नंदुरबारच्या कृतिमा नाईक (२ मि. संरक्षण व ६ गुण) हिने अष्टपैलू खेळ करत विजयाचा पाया रचला. तिला सोनल वसावे (६ गुण) आणि प्रतीक्षा गावित (६ गुण) यांनी आक्रमणात मोलाची साथ दिली. जळगावकडून गौरी जाधव (८ गुण) हिने झुंजार खेळी केली, मात्र तिचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरे पडले.

दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात धुळ्याने रायगडचा ३१-२८ असा निसटता पराभव करत पुढील फेरी गाठली. मध्यंतराला १२-२२ अशी पिछाडी असूनही रायगडने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला. साक्षी शेट्टी (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि अनया अरसुल (२.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. मात्र धुळ्याच्या नंदिनी सिसोदिया (१.२० मि. संरक्षण व १० गुण) हिने एकहाती आक्रमण करत सामना फिरवला, तर हर्षदा कोळी (२.५० मि. संरक्षण व २ गुण) हिने भक्कम साथ दिली आणि धुळ्याचा विजय निश्चित केला.

कुमार गटातील दिवसातील सर्वाधिक लक्षवेधी सामन्यात लातूरने मध्यंतराच्या १३-१६ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत जालनाचा ३४-३१ असा ३ गुणांनी पराभव केला. लातूरच्या विजयात आदित्य जाधव (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि श्रीशैल बिराजदार (१.३० व ३.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. जालन्याकडून आयन पठाण (३.२० मि. संरक्षण व ४ गुण) याने चिवट झुंज दिली; मात्र त्याला सहकाऱ्यांची अपेक्षित साथ मिळाली नाही.

कुमार गटातील आणखी एका चुरशीच्या सामन्यात धुळ्याने परभणीवर ४०-३४ असा ६ गुणांनी विजय मिळवला. धुळ्याकडून प्रतीक नगारे (२.३० व १ मि. संरक्षण व ८ गुण) याने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. परभणीकडून शिवराज चिंचलवाड (१.२० मि. संरक्षण) याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र धुळ्याची सरस कामगिरी त्यांच्यासाठी अडथळा ठरली.

उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले संघ

कुमार गट : धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे, सांगली, लातूर, पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, बीड, अहिल्यानगर आणि मुंबई.

मुली गट : सांगली, नंदुरबार, ठाणे, परभणी, धाराशिव, मुंबई उपनगर, सोलापूर, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, सातारा, मुंबई, रत्नागिरी आणि धुळे.

‘रॉयल्टी’ आकारली जाणार नाही : डॉ. जाधव

या स्पर्धेचे उद्घाटन काल सायंकाळी माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, अलकाताई राठोड, नागेश बिराजदार, मोहन रजपूत आणि शिवशंकर राठोड यांच्या उपस्थितीत झाले. या उद्घाटनाला गोविंद शर्मा, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, सचिन चव्हाण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, अश्विनी चव्हाण, डॉ. अरुण मनगोळी, महेश गादेकर, श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सुनील चव्हाण, श्रीरंग बनसोडे, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, अजित शिंदे आणि संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अंबादास पांढरे यांनी प्रास्ताविक केले, सचिन मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीकृष्ण कोळी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी कोणत्याही जिल्हा संघटनेकडून किंवा आयोजक संस्थेकडून ‘रॉयल्टी’ आकारली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!