आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातून विक्रमी सहभागाचे आवाहन

रत्नागिरी : आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १४ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत युट्युबच्या माध्यमातून विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचे उद्दिष्ट असून देशभरातून मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा प्रचार व प्रसार जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येत असून गावातील सर्व नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे, शाळा, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दवंडी, व्हॉट्सॲप गट, नोटीस बोर्ड, सोशल मीडिया आदी माध्यमांतून या उपक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्येक इच्छुक सहभागीने टोल-फ्री क्रमांक 1800-315-7008 वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर योग सत्राची लिंक प्राप्त होईल. त्यानंतर प्रत्येक सहभागी आपल्या मोबाईलद्वारे लॉग-इन करून योग सत्रात सहभागी होऊ शकेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक नोंदणीकृत सहभागीची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार आहे.
योग हा निरोगी जीवनशैलीचा आधार असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते. तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचारसरणी आणि उत्तम आरोग्य यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होऊन योगाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक १४ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत आयोजित ऑनलाइन योग सत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताच्या या ऐतिहासिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक यांनी संयुक्तपणे केले आहे.



