प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली; राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात

राजापूर : तालुक्यातील एकमेव स्थानक असलेल्या राजापूर रोड रेल्वे स्थानकात मंजूर झालेल्या लिफ्टच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. खोलगट भागात वसलेल्या या स्थानकावर प्रवाशांना दररोज चढ-उतार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता लिफ्टचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजापूर रोड स्थानकाच्या भौगोलिक रचनेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच आजारी प्रवाशांना सामानासह ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे स्थानकात लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती.
या मागणीसाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. समितीचे प्रशासकीय प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत सुमारे ६० लाख रुपयांच्या निधीतून लिफ्ट उभारणीस मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास काहीसा विलंब झाल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता कायम होती.
अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने लिफ्ट उभारणीच्या कामाला प्रारंभ केला असून सध्या बांधकाम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी आधुनिक लिफ्ट सुविधा उपलब्ध होणार आहे.
राजापूर रोड रेल्वे स्थानकावर कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर तसेच उधना आणि मडगाव-नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे लिफ्टची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होणार आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीची आता प्रत्यक्ष पूर्तता होत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



