‘ज्ञानदानातून समाजघडणीचा वसा’; माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य

खेड : शिक्षण हीच खरी समाजसेवा या भावनेतून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी सेवा संस्था (रजि.) यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तालुक्यातील श्रीमान आर. जी. काते विद्यामंदिर, धामणी येथे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात केवळ विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद आणि कार्यक्रमाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाचा खरा गौरव ठरला.
२०१८ मध्ये स्थापन झालेल्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेकडून २०१९ पासून सातत्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र यंदा संस्थेने परंपरागत चौकट मोडत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंतही मदतीचा हात पोहोचविला. त्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी ठरला.
संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध गावांतील शिक्षक विद्यार्थ्यांसह मोठ्या उत्साहाने कार्यक्रमस्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था, तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. नव्या कोऱ्या शैक्षणिक साहित्याचे संच हाती मिळताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, त्यांच्या डोळ्यांतील कुतूहल आणि आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
कार्यक्रमास विद्यामंदिरचे चेअरमन, श्री झोलाईदेवी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, शाळा समितीचे सदस्य, माजी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी पालित्रा कोंड येथील ज्येष्ठ शिक्षक पाटील गुरुजी यांनी कवितेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या भावस्पर्शी शब्दांनी उपस्थितांचे मन भारावून गेले.
मुंबईसह ग्रामीण भागांतून आलेल्या संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ‘आपल्या शाळेचे आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी एकजुटीने काम करू,’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला.
विद्यामंदिरच्या भावी वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मान्यवरांनी दिली. तसेच आगामी स्नेहसंमेलनात पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून त्यांना आपले कला-गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी झटणाऱ्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संदिप अनंत बिरवटकर यांनी दिली.



