कोंढे येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ उत्साहात
रानभाज्या प्रदर्शन व डोहाळे जेवण उपक्रमाला प्रतिसाद

दापोली : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दाभोळ, बीट फणसू अंतर्गत कोंढे येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ कार्यक्रम विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रानभाज्या प्रदर्शन, पोषण आहार पाककृती आणि गरोदर मातांचे डोहाळे जेवण अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला कोळबांद्रे जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रभाकर गोलांबडे, दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य ममता शिंदे, कोंढे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद रहाटे, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर, दाभोळ प्रकल्प अधिकारी वर्षा खांडके, पत्रकार प्रवीण शिंदे, फणसू बीट अंगणवाडी सुपरवायझर उज्ज्वला पवार, पोलीस पाटील शुभम घोडेराव, विनोद रहाटे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुबोध बोहिरे, ग्रामपंचायत सदस्य मिताली कासारे, कृषी मंडल अधिकारी नागेश तावस्कर, संतोष मांडवकर, मुख्याध्यापक धुमाळ गुरुजी, ग्रामसेवक सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जि. प. सदस्य प्रभाकर गोलांबडे व पं. स. सदस्य ममता शिंदे यांनी ‘सुदृढ बालक, सक्षम माता, समृद्ध भारत’ ही संकल्पना स्पष्ट करत दैनंदिन आहारात पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका व मदतनीस तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून अतिशय प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृष्णा महाडिक, संजय घोडेराव, प्रवीण कांसरे, शरद पालशेतकर यांच्यासह फणसू बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी रानभाज्या व पोषण आहाराच्या प्रदर्शनाला भेट देऊन समाधान व्यक्त केले.



