मराठी विज्ञान परिषद आयोजित विज्ञान निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर

रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थी गटासाठी घरातील रसायनशास्त्र तर खुल्या गटासाठी युद्धाचे हवामानावर परिणाम यावर राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा झाली. यात प्राची काळे आणि शिवम कविटकर यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे येथून विद्यार्थी गटात एकूण १४१ व खुल्या गटातून ५९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी गटाकरिता सौ. ऋणा नागवेकर व अजय ठिक (अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय) तसेच खुल्या गटाकरिता डॉ. दीप्ती जाधव व परेश गुरव (गोगटे- जोगळेकर महाविद्यालय) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थी गटात प्राची सचिन काळे (एल. टी. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, जि. रत्नागिरी) व दिव्या जयंत गावकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव, जि. सिंधुदुर्ग) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. खुल्या गटातून शिवम राजेश कविटकर (मु. पो. महादेवाचे केरवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि देवयानी सुनील जोशी (आठल्ये-सप्रे-पित्रे, कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख, जि. रत्नागिरी) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना मुंबई व कोकण विभागाकडून मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. स्पर्धेचे समन्वयक म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. उमेश संकपाळ यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले.



