पडवेतील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता अकरावी ‘स्पॉट ॲडमिशन’साठी अर्ज आवाहन; २९ जूनपर्यंत मुदत

रत्नागिरी : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कला शाखेतील इयत्ता अकरावीच्या रिक्त जागा थेट प्रवेशाद्वारे (Spot Admission) भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सीबीएसई संलग्न शाळेतून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळातून इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असावी. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच आवश्यक पात्रता व प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
यासाठी रीतसर भरलेला प्रवेश अर्ज, इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक (Marksheet), रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी पुरावा (Domicile Certificate / Residence Proof) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रवेशासाठीचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे उपलब्ध आहेत. इच्छुकांनी पूर्ण भरलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह विद्यालयाच्या कार्यालयात समक्ष जमा करावेत किंवा jnvratnagiri@gmail.com या अधिकृत ईमेलवर २९ जून २०२६ किंवा त्यापूर्वी मेल करावेत.
मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेऊन जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय यांनी केले आहे.



