रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

रत्नागिरी : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (६ जुलै) जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच चिपळूण येथील वाशिष्ठी नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्ह्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार सोमवार, दि. ६ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



