आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली

दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. दरम्यान, हे दोन्ही बार्ज हटविण्यात आले आहेत. एमएमबी, महसूल, पोलीस पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनंतर हे दोन्ही बार्ज हटविण्यात यश आले आहे.
पुलाजवळ हे दोन्ही बार्ज अडकून पडल्याने पुलाच्या संरचनेला संभाव्य धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित पोलीस प्रशासनाला पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, माणगावचे उपअभियंता यांनी मंडणगड आणि गोरेगाव पोलीस ठाण्यांना अधिकृत पत्र पाठवून पुलाजवळील मार्ग तात्पुरता बंद करण्याची विनंती केली.



