आरोग्यमुख्य बातमी

जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ मंजूर

पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी : जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भर पडली आहे. जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयास (Integrated AYUSH Hospital) राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी रु. १०.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी या रुग्णालयासाठी राज्य शासनाकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातून आणि नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाने जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, राज्यातील धुळे, सातारा, वाशीम, नांदेड आणि रत्नागिरी अशा पाच जिल्ह्यांतील आयुष रुग्णालयांसाठी एकूण रु. ६६ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला १०.५० कोटींचा निधी आला आहे.

हे भव्य रुग्णालय रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाजवळ, उद्यमनगर येथे उपलब्ध असलेल्या जागेत उभारण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या आरोग्यसेवेचा लाभ सहज घेता येणार आहे.

या एकात्मिक रुग्णालयामुळे रत्नागिरीकरांना आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या विविध पारंपरिक व आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णाभिमुख सेवांमुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणे शक्य होणार आहे.

“या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.”

– डॉ. भास्कर जगताप (जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!