रत्नागिरीत १५ जुलै रोजी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन
बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १५ जुलै रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याअंतर्गत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्लेसमेंट ड्राइव्ह’ राबविण्यात येणार आहे. हा प्लेसमेंट ड्राइव्ह बुधवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सहकारी भवन, जवाहर पथ, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. दि. चव्हाण यांनी केले आहे.
या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशासनाने खालील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत:
नवीन नोंदणी : ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ www.mahaswayam.gov.in किंवा https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर आपली नोंदणी करावी.
प्रोफाईल अद्ययावत करणे: पोर्टलवर आधीच नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत (Update) करणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष मुलाखतीसाठी कागदपत्रे: १५ जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्हच्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.
वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाची ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



