संजीवन गुरुकुलमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लुटला भात लावणीचा आनंद

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात भात लावणी कशी करतात याचा अनुभव घेत भात शेतीचा आनंद लुटला. हा उपक्रम ९ जुलै रोजी गुरुकुलचे पालक श्री. आंब्रे यांच्या चांदेराई येथील शेतमळ्यात संपन्न झाला.
भात लावणी हा केवळ शेतीचा टप्पा नसून, श्रमसंस्कार, निसर्गप्रेम आणि सामूहिक कार्याची शिकवण देणारा महत्त्वपूर्ण असा हा पर्यावरणाशी नाते जोडणारा उपक्रम संजीवन गुरुकुलात दरवर्षी साजरा होतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व व अन्नधान्य निर्मितीची प्रत्यक्ष माहिती मिळाली. निसर्ग, माती, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी संवेदनशीलता वाढीस लागण्यात मदत झाली. तसेच, प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक झाले.

भात लावणी संपन्न झाल्यानंतर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी मल्हार रजपूत याने संजीवन गुरुकुल तर्फे श्री. आंब्रे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संजीवन गुरुकुल च्या प्रबंधक श्रीमती मनाली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीच्या वर्गशिक्षिका श्रीमती वीणा पाखरे आणि हर्षदा मालणकर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. तसेच गुरुकुलातील सर्व अध्यापक यांचेही छान सहकार्य मिळाले. भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांचे विशेष प्रोत्साहन या उपक्रमासाठी लाभले.



