कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, म्हणूनच राज्यात कोकण विभागाचा निकाल नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस, आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना व युवासेनेच्या वतीने आयोजित दहावी व बारावीतील ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात आयोजित या सोहळ्यास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदा मुरकर, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंडशेठ साळवी, नगरसेविका प्रीती सुर्वे, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, तुषार साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती. नाट्यगृहाची आसनक्षमता संपल्यानंतर आयोजकांना अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. अनेक पालक व विद्यार्थी उभे राहून आपल्या सन्मानाची प्रतीक्षा करत होते.
कार्यक्रमासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पार पडली. युवा सेनेचे अभी दुडये,अथांग कदम,रोहित मायनाक, सर्वेश शेलार,लोभस देसाई,केदार कीर, अभी पेजे,देव मोरे,पार्थ पावसकर ,ओम साळवी,ऋत्विक भंडारी, दुर्वेश पांगम ,शिवसेनेचे शहर सचिव,प्रथमेश साळवी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करत कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उदय सामंत म्हणाले, “आम्ही तुम्हाला काय देणार यापेक्षा भविष्यात तुम्हाला काय बनायचे आहे, याचे ध्येय आजच निश्चित केले पाहिजे. कोकण विभाग सातत्याने अव्वल राहण्याचे श्रेय येथील विद्यार्थ्यांच्या मेहनतीला जाते.”
मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर अडचणी सोडवण्यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध राहणार असून, प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहितीही या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत उदय सामंत म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्रात कोकण आजही अव्वल आहे. भविष्यात याच कोकणातील विद्यार्थी डॉ. कलाम यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करतील. केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
बळीराजा हा देशाचा कणा असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तरुण शेतीत नवनवीन प्रयोग करत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी होत आहेत. विद्यार्थ्यांनीही शेती क्षेत्रातील संधींचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
“आपल्या आयुष्याची दिशा काय आहे, हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. कोकणातून जेव्हा मोठ्या संख्येने आयएएस, आयपीएस अधिकारी घडतील, तेव्हाच माझ्या कार्याला खरी पोचपावती मिळेल,” असेही उदय सामंत यांनी नमूद केले.
उदय सामंत यांचे नाट्यगृहात आगमन होताच विद्यार्थी व पालकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा असल्याने त्यांनी आपल्या कार्यक्रमात बदल करून हजारो विद्यार्थ्यांसोबत स्वतंत्र छायाचित्रे काढली. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या विद्यार्थ्यांची मनोगते उपस्थिताना प्रेरणादायी होती यामध्ये प्रामुख्याने पायल जाधव, स्वामी स्वरूपा विद्यामंदिर, पावस, पटवर्धन हायस्कुलची तीर्था मयेकर, श्रीया परब,आणि पायल ढेपसे,सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट ची आईराह वस्ता, सुहाना मुकादम, बुरंबी हायस्कुलचे आकांक्षा सप्रे, लावण्या वेल्ये, फाटक हायस्कुल ची स्वरा गवाणकर, पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम, खेडशी या शाळेची पायल ढेपसे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
या गुणगौरव सोहळ्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील ४२ आणि शहरी भागातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील तीन व शहरी भागातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
भावेश चव्हाण याचा विशेष सत्कार
या कार्यक्रमात रत्नागिरीच्या भावेश चव्हाण याचा विशेष सत्कार करण्यात आला. नीट परीक्षेत राज्यात एसटी प्रवर्गातून प्रथम आल्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. उदय सामंत यांनी पुढील शिक्षणासाठी अडचण आल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



