जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर; खेड शहर तिसऱ्यांदा जलमय

खेड : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचे संकट ओढावले आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी शहराच्या सखल भागात शिरू लागले आहे. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी वेळ असल्याने खेडमधील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे, तर धोक्याची पातळी ७ मीटर निश्चित करण्यात आली आहे. सध्या नदीचे पाणी ५.७० मीटर पातळीवरून वाहत आहे. पावसात खंड न पडल्यास आणि नदीची पाणीपातळी अशीच वाढत राहिल्यास ती धोक्याची पातळी गाठण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नदीच्या वाढत्या पातळीमुळे खेड शहराच्या जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. पुराचे पाणी शहरात शिरल्याने मटण आणि मच्छी मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा पूर आल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या संकटामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या भागातील स्थलांतराची तयारीही प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे समजते. पुढील आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सज्ज आहेत, तरीही नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



