मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

न्यायालयाच्या दंडानंतरही शिवाजी पथावर मासेविक्री सुरूच 

नागरिकांकडून प्रभावी अंमलबजावणीची मागणी : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

राजापूर : शहरातील शिवाजी पथावर सार्वजनिक ठिकाणी मासेविक्री करून अस्वच्छता व दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी राजापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नुकताच १२ महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, मंगळवारीही काही महिला त्याच परिसरात मासेविक्री करताना दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कारवाईनंतरही जर या मासे विक्री करणाऱ्या महिला घाबरत नसतील तर त्यांना नक्की कुणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

न्यायालयाने रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या १२ महिलांना प्रत्येकी दोन हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावल्यानंतर शिवाजी पथावर होणारी मासे विक्री बंद होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात होती; मात्र मंगळवारीही काही महिला शिवाजी पथावर मासेविक्री करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल त्यांच्यावर सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

राजापूर नगरपालिकेने मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलेली असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री होत असल्यास त्यावर सातत्याने कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्यावर मासेविक्रीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, काही नागरिकांमध्ये संबंधित महिलांना कोणाचा राजकीय पाठिंबा आहे का, अशी चर्चा सुरू असल्याचे समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळेच या महिला पुन्हा पुन्हा रस्त्यावर बसून मासे विक्री करण्याचे धाडस करत असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे .

न्यायालयाच्या आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी आणि शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!