मुख्य बातमी

ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबिर : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे प्रकाशन; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वाटप

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली जाणार आहेत. जनतेच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील जयेश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सभापती प्रवीण पांचाळ, जि. प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, दादा दळी, बंटी वणजू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबविण्यात आला होता, ज्यातून एका दिवसात लाखो प्रलंबित कामे मार्गी लागली. तोच उपक्रम आपण पुढे सुरू ठेवत आहोत. हे अभियान वर्षातील ३६५ दिवस राबवून खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.”

अधिकाऱ्यांनी जनतेशी सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एखादे काम तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल, तरीही नागरिकांना योग्य मार्ग दाखवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा असून येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समुद्रकिनारे आणि संपूर्ण जिल्हा स्वच्छ ठेवणे ही अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक तालुक्यात घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका’ पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याची माहिती सर्वांना असावी. यासाठी मान्सूनपूर्व काळात शाळा-महाविद्यालयांतील (८वी ते १२वी आणि पदवी) विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे (Disaster Management) प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यालयातील लँडलाईन ऐवजी, अधिकाऱ्यांच्या सहज उपलब्धतेसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ५०० मोबाईल फोन कार्यालयांना दिले जातील, जेणेकरून जनतेला त्यांच्याशी कधीही संपर्क साधता येईल, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

१ लाख जनतेपर्यंत पोहोचलो – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्यातच प्रशासन तब्बल १ लाख जनतेपर्यंत पोहोचले आहे. शासनाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे.

या शिबिरात विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांना देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नवीन शिधापत्रिका, आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि उत्पन्न दाखले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजुरी पत्रे, गरोदर मातांना बेबी केअर किट, ‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज मंजुरी पत्रे यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविक प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले, तर आभार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!