उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी

रत्नागिरी : येत्या काही दिवसांत मुलांच्या परीक्षा संपणार असून, लवकरच उन्हाळी हंगामाच्या सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे. या हंगामात कोकण कोकण रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने या मार्गावर मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन ही साप्ताहिक विशेष चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक ०११०४/०११०३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष : ट्रेन क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक स्पेशल ही ट्रेन ६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक (टी) येथून ७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत दर सोमवारी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी मगगाव जंक्शनला पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल. या गाडीला एकूण २० एलएचबी कोच असून, त्याची रचना टू टायर एसी १ कोच, थ्री टायर एसी ३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी २ कोच, स्लीपर ८ कोच, जनरल ४ कोच, जनरेटर कार १, एसएलआर १ अशी असेल.
ट्रेन क्रमांक ०११०४ चे बुकिंग २ एप्रिलपासून सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम्स (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. प्रवाशांना या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेमार्फत करण्यात आले आहे.



