डेरवण येथे क्रॉसकंट्री स्पर्धा व जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे. यंदा या स्पर्धेचे १२ वे वर्ष असून, ८ सप्टेंबर रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात क्रॉसकंट्री स्पर्धेसह जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
क्रॉस कंट्री स्पर्धेत १२, १४, १६ व १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रकार ठेवण्यातआले आहेत. १२ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी २ किलोमीटर; १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी ३ किलोमीटर; १६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी ४ किलोमीटर; तसेच १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ६ किलोमीटर आणि मुलींसाठी ४ किलोमीटर अंतराची शर्यत घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील युवक व युवतींना आरोग्यदायी आणि स्पर्धात्मक धावण्याचा अनुभव मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार आहेत.
क्रॉसकंट्री स्पर्धेसोबतच यावर्षी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टेबल टेनिस साठी ११/१३/१५/१७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी च्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत निवड चाचणी साठी या स्पर्धा खेळण्यात येणार असून यामधून निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची आणि स्पर्धात्मक अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर टी-शर्ट देण्यात येणार असून, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शिस्त आणि सांघिक भावना वाढविणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खेळ ही जीवनशैली असून, शरीरासोबतच मनाची शिस्त आणि सामूहिक भावना जोपासणारी शक्ती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर ही अंतिम नोंदणी तारीख असून, अधिक माहितीसाठी ९८२२६३९३०६ /९३२५४४९२०१ /९३२५८९७८७७ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



