सायबर गुन्हेगारीला बसणार चाप; जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’
ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांसाठी बँकांनी सायबर विमा उतरावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ‘शून्य’ करण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये भव्य ‘महाजनजागृती मोहीम’ राबवली जाणार आहे. पोलीस, बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेचे धडे द्यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्श न कानसे यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या अत्यंत क्लिष्ट आणि हायटेक कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नुकत्याच घडलेल्या एका गुन्ह्यात गुन्हेगारांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूच्या खात्यांमार्फत तब्बल १४०० विविध खात्यांमध्ये वळती केली. अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सामान्य नागरिकांचे सतर्क असणे हाच सर्वात मोठा उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
*पालकमंत्र्यांचे बँकांना पुढील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तंत्रज्ञानाशी फारसे परिचित नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पुंजी सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी त्यांच्या खात्यांचा सायबर विमा उतरवावा. कोणत्याही खात्यातून अचानक मोठी रक्कम ट्रान्सफर होत असल्यास बँकेने तत्काळ खातेदार आणि पोलिसांना अलर्ट करावे. खातेदारांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती बँकेतून बाहेर फुटणार नाही याची संपूर्ण खबरदारी बँकांनी घ्यावी. सायबर गुन्ह्यांच्या तपासात बँकांनी पोलिसांना विनाविलंब माहिती व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून द्यावे.
सायबर भामट्यांविरोधातील ही लढाई आता केवळ पोलिसांपुरती मर्यादित न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.



