मुख्य बातमी

रत्नागिरीत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनची अधिकृत मान्यता असलेले युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरी संलग्न मेरा युवा भारत रत्नागिरी (भारत सरकार) यांच्या वतीने शनिवारी (२९ ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील गोडाऊन स्टॉप येथील साई सेवा मित्र मंडळ येथे झालेल्या कार्यक्रमास ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत, ज्येष्ठ पत्रकार सोनाली सावंत, मधुर धुळप व पांडुरंग आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खेळाडू नुपूर नीलेश दप्तरदार व सई संदेश सुवरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. हॉकीचे जादूगर पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो, याबाबत त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडूंना प्रमाणपत्र व पदकांचे, तसेच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तेलंगणा, हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला. मयुरी मिलिंद कदम आणि रुही राम कररा यांनी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तसेच गुरुप्रसाद सावंत आणि उपर्जना राम कररा यांचाही प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.

ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना दक्षिण कोरियातून प्राप्त झालेली रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मंथन पांडुरंग आंबेकर, युसुफ मोगल, सिद्धी मधुर धुळप आणि स्वरा तेरवणकर रुद्रा सुर्वे यांना ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख प्रशिक्षक राम कररा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिरेखा कररा, गुरुप्रसाद सावंत, अमेय पाटील आणि सई सुवरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!