दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
अनय शेट्ये व चैतन्य शेट्ये यांचे उल्लेखनीय यश : गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी : शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखणाऱ्या तालुक्यातील दी मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अनय शेट्ये व चैतन्य शेट्ये यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील त्यांच्या कौशल्याची दखल घेत त्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
दि. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान नागपूर येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अनय शेट्ये व चैतन्य शेट्ये यांनी चमकदार कामगिरी बजावली. या सामन्यात कुमार चैतन्य शेट्ये याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘सामनावीर’ किताब पटकावला. विशेष म्हणजे, रत्नागिरी संघाने केवळ आपल्या दमदार खेळानेच नव्हे, तर मैदानावरील शिस्तबद्ध व आदर्श वर्तनानेही सर्वांची मने जिंकली. संपूर्ण स्पर्धेत संघाने दाखविलेल्या उत्कृष्ट खेळाडूवृत्तीची दखल घेत रत्नागिरी संघाला प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट डिसिप्लिन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
अनय व चैतन्य यांच्या या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन, कोच योगिता खाडे, आयरे टेनिस क्रिकेट असोसिएशन, रत्नागिरी तसेच दी मॉडेल इंग्लिश स्कूलचे मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीमुळे दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्तम संधी आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे हे यश शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
अनय व चैतन्य यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल मुख्याध्यापिका सौ. देशमुख, संस्थेचे अध्यक्ष अ. रहिम माद्रे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, क्रीडा शिक्षिका सौ. जाधव, शिक्षकवृंद, पालक तसेच शाळा व्यवस्थापनाने त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

