मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठा पूर्ववत

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल : दोन रिफिल बुकिंगमधील कालावधी ४५ वरून २५ दिवसांवर

राजापूर : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून कमी करून २५ दिवस करण्यात आल्याची माहिती आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे.

या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंब पद्धती, घरातील अधिक सदस्यसंख्या तसेच इतर व्यावहारिक अडचणी लक्षात घेता एका सिलेंडरवर तब्बल ४५ दिवसांचा कालावधी काढणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरत होते.

आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील ग्रामीण भागात चाकरमानी व कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येत असल्याने घरगुती एलपीजीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती.

या पाठपुराव्यानंतर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हजारो घरगुती एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण कुटुंबांची स्वयंपाकाच्या इंधनासंदर्भातील समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी एलपीजीची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश कोकणातील ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक ठरले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा अधिक सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!