शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी
तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांचे आवाहन : संगमेश्वर तालुक्यातील गणेश मंडळ निवे येथे 'लोकसंवाद २०२६'

संगमेश्वर : शासनाच्या विविध कृषी योजना गावपातळीवर पोहोचवून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय अनुदानाचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुंबई मंडळ/गणेश मंडळ निवे बु. गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. कोळी यांनी सविस्तर मार्गदर्शनात त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.
ते म्हणाले, “मागेल त्याला काजू कलमे’ या योजनेअंतर्गत कोकणात फलोत्पादनाला मोठी संधी असल्याने शासनाने जाचक अटी शिथिल करून ही योजना अत्यंत सुटसुटीत केली आहे. शेतकऱ्यांना १० ते ५० कलमे मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहेत. संगमेश्वर तालुक्यासाठी ५०,००० काजू कलमांचे उद्दिष्ट असून यासाठी निवळी, हातखंबा आणि कुळे पाचाड (चिपळूण) या रोपवाटिकांमधून कलमे दिली जात आहेत. शहरांकडून गावाकडे परतलेल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत काजू प्रक्रिया, नाचणी प्रक्रिया आणि आंबा फळप्रक्रिया प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जात आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवण्यासाठी शासनाने हे ॲप आणले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना योजना, लागवड तंत्रज्ञान व अनुदानाची माहिती घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होते. तसेच महिला सक्षमीकरणासाठी येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष प्रमाणपत्र वितरण करून महिलांना कायदेशीर अधिकार व विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमजूर महिला व प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाईल.”
काजू लागवडीसाठी ७×७ मीटर अंतरावर २×२ फुटांचे खड्डे घेऊन त्यात २ किलो सुपरफॉस्फेट, शेणखत व पालापाचोळा टाकून लागवड करावी. लागवड करताना हवेची पोकळी राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच दक्षिण-उत्तर दिशांचा विचार करून झाडांना सावली करावी, असा तांत्रिक सल्ला त्यांनी दिला.
पडीक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे व तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती अधिक फायदेशीर करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र यादव यांनी महाविस्तार ॲप डॉऊनलोड व त्याचा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव गवाणकर, ज्येष्ठ पत्रकार अमृत जाधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.



