रत्नागिरी जिल्ह्यात १ लाखाहून अधिक गणपतींना आज निरोप

रत्नागिरी : गेले पाच दिवस भक्तांकडून यथोचित पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज (१९ सप्टेंबर) गौरी-गणपतीना निरोप दिला जाणार आहे. जिल्हाभरात १ लाख १४ हजार ३५१ घरगुती, तर आठ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, विसर्जनादरम्यान रस्त्यावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात पोलिस पाटलांनाही सूचना देऊन प्रशासनाने योग्य नियाजन केले आहे.
शहरातील येथील मांडवी चौपाटीकडे जाणार्या चौकातच बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे कलश उभारण्यात आले आहे. तसेच पालिकेकडून गणेशमूर्ती संकलनासाठी एक गाडीही ठेवण्यात आली आहे. मांडवी किनारी चार रस्त्यावर पहिला पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यानंतर मांडवी नाक्यावर पोलिसांचा ताफा असणार असून किनाऱ्यावर पोलिसांच्या पथकाची नजर असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी गाडीबरोबर असलेल्या गणेशभक्तांना किनार्यावर सोडण्यात येणार असल्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.



