आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात मनसे सक्षम पर्याय म्हणून पुढे येणार
मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर

रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा सक्षम पर्याय म्हणून नक्कीच पुढे येणार आणि त्यासाठीच राज साहेबांच्या यांच्या सुचनेनुसार संघटना बांधणीवर जास्त जोर देत असल्याचे मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी सांगितले.
दक्षिण व उत्तर रत्नागिरीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहरअध्यक्ष यांची योग्य मोट बांधून प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी आदेशीत केले आहे. नेतृत्वाच्या आदेशानुसार जे अकार्यक्षम आहेत पक्षात राहून गटबाजी करतात अशांना तात्काळ बाजूला करून त्या ठिकाणी सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती केली असल्याचेदेखील कळविले आहे.
प्रत्येक महिन्यात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ते उप शहर अध्यक्ष व उपतालुकाध्यक्ष पर्यंतच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली जाणार असून, त्या बैठकीचे आयोजन ठरवून दिलेल्या क्रमाने प्रत्येक तालुक्यात केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह निर्माण होईल व ते जोमाने कामाला लागतील.
गेल्या काही दिवसांमध्ये त्याचे सकारात्मक बदल दिसत आहेत. अनेक तालुक्यात पक्ष संघटना मजबूत होतेय अनेक कार्यक्रम आंदोलन प्रवेश इत्यादी गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात देखील जनता मनसे सोबतच आहे हे दिसत आहे, असे श्री. खेडेकर यांनी म्हटले आहे.


