गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर रामदास करमरकर सेवानिवृत्त

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) कार्यरत असलेले प्रयोगशाळा परिचर रामदास दत्तात्रय करमरकर हे त्यांच्या नियतवयोमानानुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. २३ जुलै १९९० रोजी ते शिपाई पदावर रुजू झाले. १९९३ पासून त्यांनी प्रयोगशाळा परिचर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एकूण ३४ वर्ष ९ महिने त्यांनी गोगटे-जोगळेकर महविद्यालयात सेवा बजावली.
श्री. करमरकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अयोजित शुभेच्छा कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सोसायटीचे आजीव सदस्य आणि महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अतुल पित्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर महाविद्यालयाच्या वतीने कलाशाखेच्या उप-प्राचार्या तथा प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी श्री. करमरकर यांचा सत्कार केला.
या प्रसंगी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भूषण ढाले यांनी श्री. करमरकर यांच्या भौतिकशास्त्र विभागातील योगदानाचा मागोवा घेतला. एक शांत, निगर्वी सुस्वभावी आणि विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना सहकार्य करणारे श्री. करमरकर हे करमरकर काका म्हणून परिचित होते ते कायम स्मरणात राहतील, असे गौरव-उद्गार डॉ. ढाले यांनी काढले.
आपल्या मनोगतात श्री. करमरकर यांनी सेवा काळातील स्मृतींना उजाळा दिला. भौतिकशास्त्र विभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कलाशाखेच्या उप-प्राचार्या तथा प्रभारी प्राचार्या डॉ. गोस्वामी यांनी श्री. करमरकर यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या विषयीचे स्वानुभव व्यक्त केले. एक आदर्श कर्मचारी म्हणून करमरकर काका सदैव लक्षात राहतील,असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्रबंधक नंदकुमार गोळपकर, समारंभ समितीचे प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघना म्हाद्ये यांनी केले.


